कर्नाटकातील राजकीय नाटक, ११ आमदारांचा "ना"राजीनामा, पहिल्या अंक समाप्तीचे संकेत?
सह्याद्री बुलेटिन - काँग्रेसच्या ८ तर जेडीएसच्या ३ आमदारांनी आमदारकीचा राजीनामा देत कर्नाटकातील राजकीय नाट्याचा पहिला अंक संपत आल्याचे संकेत दिले आहेत.
२०१८ साली कर्नाटक विधानसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपाने १०४ जागा मिळवल्या. मात्र पूर्ण बहुमत नसल्याने सर्वात मोठा पक्ष ठरूनही भाजपाला सत्ता काबीज करता आली नाही. त्यानंतर भाजपाला दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि जेडीएस एकत्र आले. जेडीएसचे कुमारस्वामी हे मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. मात्र आता सत्तेतल्या दोन पक्षांमधल्या ११ आमदारांनी राजीनामा दिला आहे.
कर्नाटक विधानसभेच्या अध्यक्षांकडे हा राजीनामा सुपूर्द करण्यात आला आहे. या प्रकरणावर आपण सोमवारी भाष्य करू असे कर्नाटक विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी म्हटले आहे.
आता शनिवार आणि रविवार या दोन दिवसात कुमारस्वामी कोणती खेळी खेळतील, कोणती नवी पात्र येतील, आणि नाटकातील नायक बदलला जातो का ? हे सर्व लवकरच कळेल.